
मयूरी बांगर आणि वाल्मिक कराड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल
सोशल मिडीयावरील पोस्ट डिलीट करण्यासह आरोपांचा संवाद, कोण आहेत मयूरी बांगर, ऑडिओ क्लिपमध्ये काय?
बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे सातत्याने होत आहेत. मध्यंतरी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांची हत्या वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर आता बाळा बांगर यांच्या पत्नी मयूरी बांगर आणि कराड यांची एक आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे पुन्हा बीड चर्चेत आले आहे.
विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप केले आहेत. पण आता विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर आणि वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये कराड हा मयुरी यांच्याकडे सोशल मिडीयात केलेली पोस्ट डिलीट करा म्हणून विनंती करत असून मयूरी या मात्र विजयसिंह बांगर यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांकडून झालेल्या छळाचा पाढा वाचून दाखवत वाल्मीक कराडला मदतीची विनंती करत आहेत. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर यांच्याकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. मारहाण करून चारित्र्यावर संशय घेतला असाही आरोप या कॉल रेकॉर्डिंगमध्ये विजयसिंह बांगर यांच्या पत्नीने केला आहे. दरम्यान, माझ्या घरगुती वादाच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आपण भूमिका घेतल्याने हा बदनामीचा डाव आहे. तसेच पोलीसांनी या आॅडिओ क्लिपची तपासणी करुन सत्यता पडताळावी अशी मागणी केली आहे. पण बाळा बांगर यांनी केलेल्या या आरोपांमुळे आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स आणि फोटोंमुळे या प्रकरणात आणखी खळबळ उडाली आहे. (संबंधित ऑडिओ क्लिपची महाराष्ट्र खबर पुष्टी करत नाही)
मयूरी बांगर या सुरूवातीला डिसेंबर २०२४ मध्ये चर्चेत आल्या होत्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर मयूरी यांनी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ उपोषण केले होते. सध्या त्या कोणत्याही पक्षात नसल्या तरी त्यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वारंवार दिसून आली आहे.