
पुणे दि २३ (प्रतिनिधी) – पुणे शहरातील नऱ्हे येथील भूमकर चौकातील एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी मध्यरात्री दरोडा धाडसी टाकला आहे. यावेळी दरोडेखोरांना कामगारांना कु-हाडीने मारहाण करत रोकड लुटली. चोरीचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनमेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरोडेखोरांनी पेट्रोल पंपाच्या केबिनमधील २० हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली आहे. नऱ्हे भागात असलेला पेट्रोल पंप रात्री बंद करण्यात आला होता.पंप बंद केल्यामुळे वाॅचमनसह काही कामगार केबिनमध्ये झोपले होते. पण मध्यरात्री अचानक पंपावर दोन दरोडेखोर आले. त्यांनी झोपलेल्या कामगारांना धमकावत पैसे देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये कामगार शांतकुमार पाटील, अविनाश जामदार, प्रसाद शेंडकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जखमी केल्यानंतर त्यांनी २० हजार ४०० रुपयांची रोकड लुटत तिथून पळ काढला.
पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच सिंहगड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्याआधारे दरोडेखोरांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे.पण या दरोड्यामुळे व्यावसायिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.