राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आता घटनापीठाकडे
निवडणूक आयोगालाही निर्णय घेण्यास मनाई,निकाल लांबणार?
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. आमदारांची अपात्रता त्याशिवाय शिवसेना कोणाची यावादामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवले आहे. त्याची पुढील सुनावणी आता गुरूवारी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी हे प्रकरण आता घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का? या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल?राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे.
शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर जूनपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. पण सतत नवीन तारखा दिल्या जात होत्या.अखेरीस हे प्रकरण घटनापीठच्या हाती गेल्यामुळे निकाल लांबण्याची शक्यता आहे.