Latest Marathi News
Ganesh J GIF

डिजी लाॅकरवरील कागदपत्रे स्वीकारण्यास ॲक्सिस बँकेचा नकार

लोणी काळभोरमधील बँकेच्या शाखेत ग्राहकांना नाहक मनस्ताप, सरकारी नियमांना बँकेचा खो, वेळेचा अपव्यय

पुणे दि २९(प्रतिनिधी)- आजचा जमाना माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटलायजेशनचा आहे. त्यामुळे सरकार एकीकडे डिजिटला प्रोत्साहन देत आहे. पण दुसरीकडे मात्र सामान्य नागरिकांना अजूनही आपले कोणतेही काम करुन घेण्यासाठी कागदपत्रांचीच जंत्री संभाळावी लागत असल्याचे चित्र आहे. लोणी काळभोरमधील ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना नेमका हाच त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांचे कोणतेही काम कागदपत्रांअभावी काम थांबू नये म्हणून केंद्र सरकारने डिजी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे नागरिक आपल्या मोबाईलवर सेव्ह करुन ठेऊ शकतात. देशभरात सर्व ठिकाणी डिजी लॉकरमधील कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. पण लोणी काळभोर येथील ॲक्सिस बँकेमध्ये डिजी लॉकरचा पुरावा ग्राह्य धरला जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ग्राहकाला त्याच्या कामासाठी नाहक अडवणूक झाल्याचेही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एक ग्राहक बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढण्यासाठी त्यांनी ते ज्या कंपनीत काम करतात त्याचे ओळखपत्र पाठवले. त्यांना ते आयडी कार्ड चालणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी बँकेचे व्यवस्थापक निलेश गुंड यांच्याशी संपर्क केला. पण गुंड यांनी तनुजा शहा यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यांनी शहा यांच्याकडे एखाद्याकडे ओळखपत्र नसेल तर बँकेकडे काही तरी पर्याय असेल ना? अशी विचारणा केली असता त्याला नकार देण्यात आला. त्याचबरोबर व्हॉट्सऍपवर किंवा झेरॉक्स चालते का? असे विचारले असता, मुळ कागदपत्र दाखवावे लागेल असे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी ”शासनाचे डिजी लॉकर चालत असेल ना?” असेही विचारले. तेव्हा त्यांनी ”अजिबात चालत नाही”, असे म्हणत सहकार्य करण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला. त्यामुळे त्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील सहकार्य करण्यास नकार दिल्याने सामान्य ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान त्या ग्राहकांनी मूळ आधार कार्ड घरून घेऊन आल्यानंतरच त्यांन पैसे देण्यात आले.

कोरोना काळात अनेक बँकांनी पेपरलेस आणि पर्यावरणपूरक म्हणून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. त्यामुळे डिजी लाॅकरला मान्यता देण्यात आली. अनेक बँकामध्ये डिजी लॉकरमधील कागदपत्रे कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. कारण डिजी लॉकर हे शासनाकडून प्रमाणित करण्यात आलेलं वॉलेट असल्याने या वॉलेटमधील कागदपत्रं सरकारी कामांसाठी ग्राह्य धरली जातात. पण ॲक्सिस बँकेने मात्र ग्राहकांच्या अडवणुकीचे धोरण का आखले आहे? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!