जिओ सिनेमावर आयपीएल पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी
जिओ सिनेमासाठी मोजावे लागणार पैसे, जाणून घ्या सबस्क्रिप्शनची संपूर्ण माहिती
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- यंदा आयपीएल जिओ सिनेमावर असल्याने सर्वांना ते मोफत पाहता येत आहे. पण आयपीएल प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. कारण जिओ सिनेमा प्रत्येक कंटेंटसाठी सबस्क्रिप्शन चार्ज आकारणार आहे. जिओ सिनेमा आयपीएलच्या अखेरीस सबस्क्रिप्शन सेवा सुरू करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी लोकांना जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग विनामूल्य पाहण्याची संधी दिली आहे, पण एका मुलाखतीत रिलायन्सच्या मीडिया आणि कंटेंट बिझनेसच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी सांगितले की, जिओ सिनेमाच्या प्रमोशनसह कंटेंटसाठी शुल्क आकारणे सुरू होईल. मात्र, किंमत निश्चित करण्याचे धोरण अद्याप ठरलेले नाही. त्या पुढे म्हणाल्या की २८ मे रोजी आयपीएल संपण्यापूर्वी सामग्री जोडली जाईल. तोपर्यंत प्रेक्षक सामना विनामूल्य पाहू शकतात. आयपीएलनंतर जिओ चित्रपट पाहण्यासाठीही सबस्क्रिप्शन चार्ज लागू केला जाऊ शकतो. यासाठी किती शुल्क आकारला जाईल, याबाबत जिओ सिनेमा लवकरच निर्णय घेईल. मुकेश अंबानी आपला हा प्लॅटफॉर्म ग्लोबल मीडिया आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग जायंट बनण्यासाठी तयार करत आहेत. हे पाहता गेल्या वर्षी Viacom18 Media Pvt ने IPL चे डिजिटल राइट्स विकत घेतले होते. रिलायन्स प्लॅनची किंमत दर्शकांसाठी सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न करेल. सध्या जिओ सिनेमावर बहुतांशी पाश्चात्य कंटेंट आहे, त्यामुळे कंपनीला कंटेंट बदलायचा आहे. ज्योती म्हणाल्या की, आम्हाला जास्तीत जास्त भारतीय सामग्री द्यायची आहे. असे जिओ कडून सांगण्यात आले आहे.
इंटरनेटच्या वाढत्या अॅक्सेसमुळे भारतातील प्रेक्षकांची संख्या ही भली मोठी प्रचंड आहेत. जिओ सिनेमाने एप्रिलमध्ये आयपीएल च्या सुरूवातीला १.४७ अब्ज पेक्षा जास्त व्हिडीओ व्ह्यूज आणि बुधवारी एका सामन्यासाठी २२ मिलियन्स व्ह्यूज मिळवले आहे. पण हा आनंद अल्प काळ टिकणार आहे.