(मुंबई) – बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडीक आल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शाळा आणि बदलापूर स्थानकात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आंदोलन सुरु केले होतं. त्यामुळे कित्येक तास मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर आता बदलापूर स्थानकात रेल्वे रुळांवर उतरलेल्या शेकडो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
सकाळपासून हे आंदोलन सुरु होते. त्यानंतर तब्बल १२ तासांनी पोलिसांनी लाठीचार्जची कारवाई केली असून आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र यावेळी आंदोलकांनी तिथून पळ काढताना पुन्हा एकदा पोलिसांवर दगडफेक केली. या दगजफेकीमध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत. आंदोलनकांनी स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर एका एसटी बसची ही तोडफोड केली. आता पोलिसांनी या कारवाईबाबत माहिती दिली आहे. बदलापूर स्थानकातील आंदोलनामुळे मध्य रेल्वेने अंबरनाथपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मध्य रेल्वेकडून याबाबतची घोषणा करण्यात आली.
कर्जत मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या अंबरनाथपर्यंत सुरु होत्या. तर लांब पल्ल्यांच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आंदोलक काही केल्या हटत नसल्याचे रेल्वेची वाहतूक सुरु करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. “आम्ही आता बदलापूर रेल्वे स्थानकातील ट्रॅक रिकामे केले आहेत. याची माहिती रेल्वे प्रशासनाला द्यायची आहे. त्यामुळे हा अहवाल आम्ही रेल्वेला पाठवत आहोत. बदलापूरपर्यंत रेल्वे येण्यासाठी रेल्वेला अहवाल देणे महत्त्वाचे आहे. या विषयी काय आणि कोणावर कारवाई याची विस्ताराने माहिती मी देईल. रेल्वेची वाहतूक सुरळीत करणं महत्त्वाचं होतं,” अशी माहिती लोहमार्ग आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली.