बदलापूर पुन्हा हादरलं ! बापाचं निर्घृण कृत्य ; बापलेकाचं भांडण लोकांच्या जीवावर बेतलं, व्हिडिओ व्हायरल
मुंबई – चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे आंदोलन पेटलेलं असताना दुसरीकडे बदलापुरातूनच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अंबरनाथ येथील कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील चिखलोली भागात मंगळवारी संध्याकाळी कौटुंबिक वादातून घरातीलच व्यक्तीने दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत माथेफीरू वाहन चालकाच्या धडकेत दोन नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत.
बदलापूर येथे राहणारे सतीश शर्मा यांचे वडील बिंदेश्वर शर्मा हे त्यांच्या कुटुंबातील सतीशची पत्नी, नातू तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी आपल्या वाहनाने घेवून जात होते. मात्र सतीश यांचा पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या रागातून सतीश याने आपल्या कुटुंबाच्या वाहनाचा पाठलाग करत राज्य महामार्गावरील त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. तसेच रस्त्यावरील दोन पादचाऱ्यांनाही फरफडत नेले.
त्यानंतर पुन्हा पुढे नेलेलं वाहन मागे वळून दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबाच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत समोरील वाहना मागे असलेले मोटर सायकलस्वार ओम चव्हाण व हर्ष बेलेकर यांना जोरात ठोकर बसून ते फॉर्च्युनर गाडी खाली आल्याने जखमी झाले. यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या प्रकरणी रात्री उशिरा आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मानसिकतेवर संताप व्यक्त केला जात आहे.