आर्यन शुगरची थकीत शेतकऱ्यांची रक्कम बजरंग सोनवणे देणार
जिल्हाधिका-यांसोबतच्या बैठकीत तोडगा, पण आमदार राऊत काय म्हणाले बघाच....
सोलापूर दि ३० (प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील बहुचर्चित आर्यन शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसबिलाचे पैसे थकवले आहेत. त्यावरून सतत राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात. पण राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी आर्यन कारखाना विकत घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत एक महत्वाची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आहे.
माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी निगडीत असलेल्या आर्यन शुगरवर सोलापूर जिल्हा बँकेचे कर्ज थकित असल्यामुळे ताबा घेतला होता. त्यानंतर हा कारखाना बीड येथील राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी ॲग्रोने विकत घेतला आहे.पण आर्यन शुगरकडे असणारी २१ कोटी रुपयांची थकित एफआरपी कोणी द्यायची यावरून वाद निर्माण झाला होता.यावरून राऊत यांनी सोपल यांच्यात शाब्दिक चकमक देखील उडाली होती. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार राजेंद्र राऊत, येडेश्वरी ॲग्रोचे चेअरमन बजरंग सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, डीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई यांच्यात झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला.बैठकीअंती येडेश्वरी ॲग्रोने थकीत एफआरपीची रक्कम देण्याचे मान्य केले आहे. यासाठी जिल्हा बँक त्यांना मदत करणार आहे.
बैठकीबद्दल माहित देताना आमदार राऊत म्हणाले की, “आर्यन शुगरला गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची यादी शोधण्यासाठी बार्शीचे तहसीलदार, डीसीसी बँकेचे प्रतिनिधी, येडेश्वरी ॲग्रोचे प्रतिनिधी, साखर सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी आणि आर्यन शुगरचा भागधारक शेतकरी यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे.या समितीच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थकीत रक्कम देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे” असे राऊत यांनी स्पष्ट केले.यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.