बाळासाहेब ठाकरेंनीही दिलेला शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा
शरद पवारांनी गिरवला मित्र बाळासाहेब ठाकरेंचा कित्ता, महाराष्ट्रातील राजकारण खळबळ
मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. पण या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी करीत आहे. पण या राजीनाम्यानंतर आता बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी दोन वेळा शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र शिवसैनिकांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी दोन्ही वेळा आपला निर्णय मागे घेतला होता. बाळासाहेब ठाकरेंनी १९७८ साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीवेळी “या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईवर भगवा फडकला नाही, तर मी शिवसेनाप्रमुखपदावरून दूर होईन,” अशी घोषणा केली. मात्र एकूण ११७ उमेदवारांपैकी शिवसेनेचे फक्त २१ उमेदवारच निवडून येऊ शकले. या निवडणुकीनंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बाळासाहेबांनी थेट शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पण शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा धारण करत बाळासाहेबांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर शिवसैनिकांची भूमिका लक्षात घेऊन बाळासाहेबांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. दुसरा प्रसंग १९९२ चा होता, शिवसेनेचे पदाधिकारी माधव देशपांडे यांनी जुलै १९९२ मध्ये पत्रकार परिषद घेत हे आरोप केले होते. “शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची वैयक्तिक जहागिरी बनली आहे. ते मुलाच्या आणि पुतण्याच्या तालावर नाचत असून शिवसैनिकांनी निष्ठेने उभारलेली शिवसेना ते मोडून काढत आहेत. ठाकरे यांनी स्वत:भोवती शिवसेनेला कोंडून ठेवले आहे,” असे गंभीर स्वरुपाचे आरोप तेव्हा माधव देशपांडे यांनी केले होते. या आरोपानंतर ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. “शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत अखेरचा जय महाराष्ट्र!” असे निवेदन बाळासाहेब ठाकरे यांनी सामनात दिले होते. या सर्व घडामोडींनंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी मुंबईत दाखल होत बाळासाहेबांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. तर काही शिवसैनिकांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी आपला शिवसेनेचे पक्षप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेतला होता.
शरद पवार यांनी अचानकपणे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून दूर होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तर सामुहिक राजीनामा देणार असल्याचेही सुतोवाच केले आहेत. पण शरद पवार यांनी दोन तीन दिवसात आपला निर्णय जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात शरद पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.