बापू डायलाॅगबाजी बंद करा..बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या
उद्धव ठाकरेंवर टिका केल्याने यांची शहाजी बापूंवर 'एकदम ओक्के' टिका
सोलापूर दि १ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला आता पंढरपूर मधील युवासेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यामुळे शिवसेना आणि आमदार शहाजी बापू पाटील वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे. ओक्के हा बापूंचाच डायलाॅग वापरत टिका करण्यात आली आहे.
‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील… एकदम ओक्के’ या डायलाॅगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार पाटील हे आता जिथे जातात तिथे ठाकरे आणि शिवसेनेचे टिका करत असतात. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याआधी शिवसेनेकडुन सांगोल्यात शेतकरी मेळावा घेत बापूंना आव्हान देण्यात आले होते. आता थेट सोशल मिडीयाच्या माध्यमातून बापूंना टार्गेट करण्यात आले आहे.युवा सेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोल यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकना.. काय ते ५० खोके समंद कसं ओके…’ ‘बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल..आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु,’ ‘टक्केवारी घेऊन आधी स्वतःच घर पूर्ण करा…बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या, अशी बोचरी टीका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
शहाजी बापू हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार होते.पण शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर बापूंनी शिंदेना साथ दिली. पण अलीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. युवसेनेच्या टीकेला आमदार शहाजी पाटील काय उत्तर देणार याची उत्सुकता असणार आहे.