Latest Marathi News

बावनकुळेंनी घेतली तारपावादक भिकल्या धिंडाची भेट

मोदींनीही घेतली होती दखल, मोदींनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणले, धिंडांची भावना

पालघर दि २७(प्रतिनिधी)- जव्हार तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या काशिवली या गावी आज, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध तारपावादक भिकल्या धिंडा यांची भेट घेतली. या भेटीने आदिवासी संस्कृती, परंपरा आणि संगीत यासंदर्भातील चर्चा झालीच शिवाय, मोदी सरकारने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची मांडणी सुद्धा धिंडा यांनी केली.

महाराष्ट्रभरात उत्कृष्ट तारपावादक म्हणून भिकल्या धिंडा यांची ओळख आहे. ते स्वतः तारपावाद्याची निर्मिती करून चरितार्थ चालवतात. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य त्यांनी वेचले आहे. आज त्यांनी आदिवासी नृत्यावर तारपा वादन केले तेव्हा उपस्थित सर्वच मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या कला साधनेवर भारावून गेले. भिकल्या धिंडा यांनी बावनकुळे यांच्या भेटीने कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, तारपा वादन करण्यात माझी पूर्ण हयात गेली. चौथी पिढी या कलेची साधना करीत आहे. आदिवासी समाज आपल्या संस्कृतीला घेऊन जिवंत राहील पण आता आदिवासी समाजाने शिक्षण घेतले पाहिजे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असा सल्लाही त्यांनी दिला. बावनकुळे याच्यासमोर धिंडा यांनी तारपा वाद्य निर्मिती व त्याच्या अंगांचे सांस्कृतिक महत्व विषद केले. मागील ७० वर्षांपासून धिंडा यांनी ही कला जोपासली आहे. केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि आजवर कोणत्याही राष्ट्रीय पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या कलावंताना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार २०२२ प्रदान केले. त्यामध्ये भिकल्या धिंडा यांचा समावेश आहे.

आदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे तारपा वाद्य वाजवण्याचा दीर्घ वारसा सांभाळणारे धिंडा यांच्या कारकिर्दीची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी आदिवासी संस्कृती व त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली, असे धिंडा यांनी बावनकुळे यांना सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!