किरकोळ कारणातून टोळक्याची लाठ्या काठ्यांनी मारहाण
हाणामारीचे सीसीटीव्ही व्हायरल, पोलीसांकडुन मात्र सपशेल दुर्लक्ष
नाशिक दि १०(प्रतिनिधी)- नाशिक शहरातील सिडको परिसरातील गावगुंडांची दहशत निर्माण करण्यासाठी हाणामारी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा हाणामारीची हद्दीत घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण हाणामारीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे सिडको परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकच्या सिडको परिसरात किरकोळ कारणातून एका टोळक्याने दोघाजणांना जबर मारहाण केली आहे. यामध्ये त्या तरूणांनी पळ काढल्यामुळे ते बचावले आहेत.अगदी क्षुल्लक कारणावरून वाद घालत लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावगुंडाच्या भीतीने अंबड पोलिसात तक्रार देणे टाळले आहे.पण सिडको परिसरात हाणामारीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तक्रार येत नसल्यामुळे अंबड पोलिसही अशा घटनांकडे दुर्लक्ष करत असल्यासारखी परिस्थिती आहे. पोलीसांनी कुठलीही कठोर भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. गावगुंडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
सिडको परिसरात यापूर्वीही घरांवर दगडफेक, लाठ्याकाठ्या घेऊन गल्लीत दहशत निर्माण करण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कोयते घेऊन मिरविण्याचा प्रकारही घडला होता. पण घटना असतांना पोलीसांनी कुठलीही कठोर भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.