CRIME NEWS – महिलेचा शिरच्छेद केलेल्या मृतदेहामुळे त्यांच्याकडे फारसा सुगावा नव्हता. मात्र महिलेच्या हातावरील टॅटू्च्या आधारे पोलिसांनी वसई-विरारमधील सुमारे 15-20 टॅटूच्या दुकानांवर छापे टाकले. या तपासणीत टॅटू बनवणाऱ्याने महिलेच्या हातावरील त्रिशूल आणि ओमचा टॅटू ओळखला. त्याच्याकडून मिळालेल्या सुगावाच्या आधारे महिलेची अंजली सिंग अशी ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. आणि अखेर तिचा पती मिंटू सिंग आणि मेहुणा चुनचुन सिंग यांना अटक केली.
काय आहे प्रकरण ?
भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात उत्तन पातान बंदर येथे समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळला. एल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत, पुढील तपास सुरू केला. मृत तरुणीच्या हातावर त्रिशूल आणि ओमचा टॅटू बनवलेला होता. पोलिसांनी त्याच टॅटूच्या आधारावर मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच घेतला जीव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिंटू सिंगला पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. 24 मे 2023 रोजी दोघांमध्ये भांडण झाले आणि मिंटू सिंगने रागाच्या भरात चाकूने गळा कापून पत्नीचा खून केला. यानंतर घरात असताना त्याने धडापासून डोके वेगळे केले आणि भाऊ चुंचुनच्या मदतीने शीर नसलेला मृतदेह सुटकेसमध्ये भरून भाईंदरच्या खाडीत फेकून दिला.
त्यानंतर तो आपल्या दीड वर्षाच्या मुलाला सासरी सोडून हैदराबादला गेला आणि तेथून पत्नीचे दागिने घेण्यासाठी तो मुंबईला परत आला. मात्र पोलिसांना त्या महिलेचा मृतदेह मिळाला आणि त्यांनी टॅटूवरून शोध घेतला. दोन्ही आरोपींना ते पळून जाण्याआधीच दादर स्थानकातून अटक करण्यात आली.