
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याने कधीही वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. तसेच, ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनीही मंगळवारपासून (ता.18 जून) जोर धरला आहे. परंतु, या सर्व चर्चांवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांनी छगन भुजबळ यांच्याबाबतचे स्पष्ट मत व्यक्त करत भुजबळांना पक्षात घेऊन वातावरण खराब करायचे नाही, असा टोला लगावला आहे.
प्रसार माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत घरवापसी करणार असल्याबाबतचा प्रश्न विचारल. यावेळी राऊतांनी या प्रश्नाला उत्तर देत म्हटले की, भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेते होते, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते अजित पवार गटासोबत आहेत. आता त्यांचे शिवसेनेशी काहीही नाते नाही. त्यामुळे आता जर कोणी अशा अफवा पसरवत असतील की भुजबळ आणि ठाकरे गटात काही चर्चा सुरू आहे. तर ते चुकीचे आहे. असं काहीही नाही. आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेनेचे सगळं उत्तम सुरू आहे आणि त्यांना घेऊन आम्हाला वातावरण बिघडवायचे नाहीये, असा खोचक टोलाच राऊतांनी लगावला आहे.
तर, गेल्या दोन दिवसांपासून छगन भुजबळ यांच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा चालू आहे. मात्र ते कोणत्या वाटेने येत आहेत ते आम्हाला माहिती नाही. ती वाट आम्हाला तरी दिसलेली नाही. भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. मात्र त्याला आता मोठा कालखंड लोटला आहे. ते त्यांच्या प्रवासात पुढे गेले आहेत. शिवसेना स्वतःच्या प्रवासात खूप पुढे निघून गेली आहे. त्यामुळे या अफवांमध्ये तथ्य नाही.तसेच, छगन भुजबळ यांचा शिवसेनेची कोणताही संवाद नाही. तसा संवाद होण्याची शक्यता देखील नाही. कारण त्यांनी आता स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडला आहे. शिवसेना आणि भुजबळ यांच्या भूमिका एकसारख्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे भुजबळ येणार, जाणार, चर्चा होणार अशा बातम्यांना अर्थ उरत नाही. आम्ही या बातम्यांकडे केवळ अफवा म्हणून पाहतो. आम्ही त्यास महत्त्व देत नाही, असे खासदार संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.