Latest Marathi News
Ganesh J GIF

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का ; अजित पवार गटाचे ‘हे’ बडे नेते शरद पवार यांच्या वाटेवर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. अशातच आता अजित पवार यांना दोन मोठे धक्के बसले आहेत.अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या वाटेवर असून ते लवकरच तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. माजी आमदार विलास लांडे आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे लवकरच तुतारी हाती घेणार असून विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मी पवारांसोबतच आहे. मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही. आजूबाजूच्या नेत्यांना ताकद देणार आहे. जास्तीत जास्त पवारसाहेबांचे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहे.’, असे विलास लांडे यांनी सांगितले. तसंच, ‘लपून छपून मी कधी भेटलो नाही. पवारांसोबत आम्ही कायम आहे, साहेब दैवत आहे, सर्वसामन्याचा नेता आहेत. शिरूर पिंपरी मधील उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी आलो आहे. आम्हाला अनेक जागा मिळतील. मी साहेबांसोबत आहे, लोकसभा निवडणुकीपासून सोबत आहे. अजितदादांनी लोकसभेला दिलेला उमेदवार पटलेला नव्हता. १८-१९ तारखेला जागा वाटप साहेब जाहीर करणार आहेत.

भोसरी, खेड, मावळ, पुणे या ठिकाणी प्रचार करणार आहे. अजित दादाशी वैयक्तिक संबंध आहेत.’ विलास लांडे हे पिंपरी चिंचवडचे माजी आमदार आहेत. ते शरद पवार गटामध्ये जाणार असल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अजित पवारांची साथ आणखी एक आमदार सोडणार आहे. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार गटाकडून ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राजेंद्र शिंगणे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!