
मध्य प्रदेशात सहा वेळा विधानसभेवर निवडून जाणारे कॉंग्रेसचे नेते रामनिवास रावत यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.विजयपूरच्या या दिग्गज नेत्याने कॉंग्रेसची साथ सोडल्यामुळे पक्षाला हा मोठा झटका असल्याचे मानले जाते आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून मुरैना येथून लढत दिली होती. मात्र माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आताची याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती.
कॉंग्रेसने त्यांना तिकिट नाकारून सत्यपाल सिंह यांना रिंगणात उतरवले आहे. रामनिवास रावत यांच्यासह महापौर शारदा सोलंकी आणि त्यांचे कार्यकर्तेही भारतीय जनता पार्टीत दाखल झाले आहेत.विशेष म्हणजे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आजच मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आणि त्यांची तेथे प्रचारसभा होत असताना पक्षाला हा हादरा बसला आहे.दरम्यान, विचारधारेशी प्रामाणिक राहणे हे प्रत्येकाला जमत नाही. त्यांनी केवळ मंत्रिपदाच्या लालसेने भाजपमध्ये प्रवेश केला आहे अशी टीका रावत यांच्यावर कॉंग्रेसचे नेते मुकेश नायक यांनी केली आहे.