
मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंकडून कृषी खाते काढले?
अजितदादांचा हा नेता होणार नवा कृषीमंत्री, कोकाटेंना आता 'हे' खातं मिळणार?, लवकरच खातेपालट?
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत होते. पावसाळी अधिवेशन चालू असताना ते सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळताना आढळले होते. ते गेम खेळताचा व्हिडीओही सगळीकडे व्हायरल झाला होता. आता त्यांच्याकडून कृषीखाते काढून घेतले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून राजीनामा न घेता कृषिमंत्रीपद दुसऱ्या नेत्याकडे सोपवले जाऊ शकते अशी चर्चा आहे. कृषिमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाची घोषणा लवकरच होणार असल्याची शक्यता आहे. मकरंद पाटील किंवा दत्ता भरणे यांच्यापैकी एकाकडे कृषिमंत्रीपदाचा भार दिला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडील एक खाते माणिकराव कोकाटे यांना दिले जाऊ शकते असे म्हटले जात आहे. कोकाटे यांना क्रीडा खाते मिळणार असल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्या खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा आरोप करण्यात आला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या मुंडेंना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कृषीखातं परत आपल्याला मिळावं, यासाठी प्रयत्न धनंजय मुंडे प्रयत्न करत आहेत अशी माहितीही समोर आली आहे. पण त्यांचे पुनरागमन अवघड आहे. रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक त्यांचा राजीनामा मागत आहेत. मात्र आता कोकाटे यांचे खाते बदलले जाणार आहे. त्यामुळे विरोधक यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता हे खातेपालट केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
माणिकराव कोकोटे हे सुरुवातीपासून वादग्रस्त राहिले आहेत. कधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणाले तर नुकतेच त्यांनी सरकारला भिकारी म्हटले आहे. कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्न करतात असा आरोपही त्यांनी शेतकऱ्यांवर केला होता. बीड, परळी, परभणीमध्ये पीकविमा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला, त्यालाही कृषिमंत्री कोकाटे यांनी दुजारा दिला होता. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात विधान परिषदेत माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर ऑनलाईन पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला.