शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोनदा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर आता एकत्रित सुनावणी होणार आहे.मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात 31 ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे. सर्व निषेध याचिका आणि दोन्ही क्लोजर रिपोर्टवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती कोर्टानं मान्य केली आहे.
शिखर बँक घोटाळा क्लोजर रिपोर्ट प्रकरणात सुनावणी निश्चित करण्या आली आहे, परंतु आता आर्थिक गुन्हे शाखेने दोनदा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार असल्यानं अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात 31 ऑगस्टला या प्रकरणात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार आहेत.25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.न्यायाधीश ए यू कदम यांच्यापुढे याप्रकरणात सुनावणी झाली. या सुनावणीत माणिकराव जाधव यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आणि माधवी अय्यापन यांनी न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, त्यानंतर यंदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वीच सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांमार्फत आणखी 50 निषेध याचिका दाखल केल्या जाणार आहेत, अशी माहिती ॲड तळेकर यांनी न्यायालयाला दिली. आता या सर्व निषेध याचिका आणि दोन्ही क्लोजर रिपोर्टवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती कोर्टानं मान्य केली आहे.