
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हाती असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती.पण आता शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता असून त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ येणार आहे. अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हे अध्यक्षपद त्यांना सोडावं लागणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी महिनाभरापुर्वी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनां नुसार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या घटनेत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवारांनाअसोसिएशनच्या
अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. नव्या नियमानुसार आता कोणत्याही व्यक्तीला दोन टर्मसाठी किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ संघटेनेच्या अध्यक्षपदावर राहता येणार नाही. नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २६ मार्च २०१३ रोजी अजित पवार यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. पण आता त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. स्पोर्ट्स कोडनुसार अजित पवार यांना पुढील ५ वर्षे सदस्य वगळता इतर पदांवर
संधी मिळणार नाही.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालची कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी भाजपाने विजय मिळवला होता. आता अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता असणार आहे.