मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा
'या' दिवशी होणार मतदान, 'हा' दिवस ठरवणार सत्ता कोणाची, आप भाजपात लढत
दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात दिल्ली काबीज करण्यासाठी प्रमुख लढत होणार आहे. अनेक प्रमुख पक्ष मैदानात असले तरीही मुख्य लढत ही भाजपा आणि आप यांच्यात होणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. दिल्लीत पाच फेब्रुवारीला मतदान तर आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. दिल्ली विधानसभेला ७० जागांसाठी ही निवडणूक होणार असून, एकूण १.५५ कोटी मतदार आहेत. २.८ लाख मतदार हे युवक म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे आहेत. दिल्लीत एकूण १३ हजार ०३३ मतदार केंद्र आहेत. दिल्ली विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपत आहे. याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार १८ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. यामुळे १८ फेब्रुवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारी रोजी झाली होती. ८ फेब्रुवारी २०२० रोजी सर्व ७० विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि ११ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला होता.
आम आदमी पक्षाने दिल्लीतील सर्व ७० जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्याचवेळी भाजपने २९ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. याशिवाय काँग्रेसने आतापर्यंत ४० हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.