
मोठी बातमी! राज्यात लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार
महायुतीतील 'या' मंत्र्यांना मिळणार नारळ, अनेक नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी, धक्कातंत्राचा वापर
मुंबई – राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. या धक्का तंत्राचा अनेक बड्या मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून अनेकांना नारळ दिला जाणार आहे.

राज्यात प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुती सरकारला सहा महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पण त्यांना म्हणावा असा प्रभाव टाकता आलेला नाही. सरकारमधील अनेक मंत्री वादग्रस्त राहिले आहेत. अनेकांवर घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे जनमानसात सरकसरबद्दल असंतोष आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करत प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून अनेक विद्यमान मंत्र्यांचे पत्ते कट केले जातील, असे बोललं जात आहे. अनेक मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड असमाधानकारक आहेत. भाजपा बरोबरच शिंदे आणि पवार गटातील मंत्र्यांनाही झळ बसण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ फेरबदलात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षसंघटनेत चांगले काम केलेल्या किंवा आपापल्या भागांमध्ये मजबूत पकड असलेल्या नेत्यांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, तसेच इतर पक्षातून आलेल्या मोठ्या नेत्यांनाही मंत्रीमंडळात स्थान दिले जाणार आहे. शिंदे गटातील संजय शिरसाट, संजय राठोड, भारत गोगावले हे मंत्री वादग्रस्त राहिले आहेत. तर धनंजय मुंडे यांना तर थेट राजीनामा द्यावा लागला होता. भाजपातील काही मंत्री धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत. त्याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत बसू शकतो. त्यामुळे प्रादेशिक समतोल राखण्यासाठी अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांनीही दिल्लीवारी केली होती. त्यामुळे लवकरच धक्कातंत्र असलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.


