
मोठी बातमी! छगन भुजबळ घेणार आज मंत्रीपदाची शपथ
भुजबळांची नाराजी दुर, धनंजय मुंडेच्या खात्याचा मिळणार कार्यभार, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची खेळी
मुंबई – राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजभवनाकडून तसे परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. यामुळे भुजबळ यांची नाराजी दुर करण्यात आली आहे.
सकाळी १० वाजता हा शपथविधीसोहळा राजभवनात पार पडणार असल्याचं देखील सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले छगण भुजबळ अखेर मंत्रिमंडळात दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा खातं भुजबळ यांना मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप झाले. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हे मंत्रीपद रिक्त होते. छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. अनेकदा शेरोशायरी करून टोमणेही मारले होते. इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यांना काही मंत्रिमंडळात जागा मिळाली नव्हती. मात्र आता त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याने भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांची ओबीसी नेते अशी ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या छबीचा महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ओबीसी मतांंसाठी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. आधीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं होतं. नंतर ते खातं धनंजय मुंडे यांच्याकडे गेलं. आता हेच खातं भुजबळांच्या पदरी पडणार आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्याना नाशिकमधून सोमवारी रात्रीच तातडीने मुंबईत बोलावून घेतली असल्याची बातमी आहे.
पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच परळी दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर भुजबळांच्या मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आयोजित केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. परळीमध्ये मुंडेंसोबत अजित पवारांची नेमकी चर्चा काय झाली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.