
मोठी बातमी! राज्यात दर वीस दिवसांनी होणार निवडणूक
दिवाळीनंतर फुटणार राजकीय फटाके, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा उडणार धुरळा, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल नोव्हेंबर महिन्यापासून वाजण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण होऊन लोकप्रतिनिधींचे राज्य सुरु होईल.नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका- नगरपंचायत, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील.
दर वीस दिवसांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या तयारीला दिवाळीनंतर वेग येईल असे मानले जात आहे. जानेवारीच्या शेवटापर्यंत सर्व निवडणूका पुर्ण करण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष पदाची सोडत काढण्यात आली आहे. काही दिवसांत महापालिका आरआरक्षणाची सोडत निघणार असुन प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावरील प्रशासन राज संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींच राज्य येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाने तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडतदेखील काढण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्यात आली, त्याला मान्यतादेखील देण्यात आली. आता येत्या काही दिवसांत प्रभागातील वॉर्डांच्या आरक्षणाची सोडत निघेल, महापौरपदाचे आरक्षणदेखील जाहीर होईल असे मानले जात आहे. नगरपालिका-नगरपंचायतीसाठीच्या निवडणुकीचीदेखील तयारी केली जात आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना ते ते पक्ष सामोरं जातील का, याचे कार्ड सर्वच पक्षांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत दिसून येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी बंडाळी होऊ शकते. तर काही ठिकाणी काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.