मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक
पहाटेच्या वेळी सीआयडीने केली अटक, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ, या योजनेत घोटाळ्याचा आरोप
हैद्राबाद दि ९(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली असून भ्रष्टाचार प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सीआयडीने त्यांना अटक केली आहे.
माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी सीआयडीनं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. नायडू यांच्यावर लावण्यात आलेली कलमं अजामीनपात्र आहेत. विशेष म्हणजे काही दिवसापूंर्वी चंद्राबाबू नायडू यांनी आपल्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा केला होता. कौशल्य विकास विभागात घोळ झाल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर ठेवण्यात आला असून या संदर्भात २०२१ साली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आंध्रप्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असुन विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. नायडू यांचे शुक्रवारी नंदयाला जिल्ह्यात बनगनपल्ली येथे एका जाहीर सभेत भाषण झाले. त्यानंतर ते आपल्या कारमध्ये आराम करीत असताना सीआयडीचे अधिकारी त्यांच्या कारजवळ पोहचले, त्यावेळी नायडू यांच्या कारला कार्यकर्त्यांनी मानवीसाखळी केली होती. सीआयडी पथकाला ते विरोध करीत होते. अखेर सकाळी त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असून त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मी कोणताही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार केला नाही. CID ने मला कोणतीही योग्य माहिती न देता अटक केली आणि मी त्यांना पुरावे दाखवण्यास सांगितले पण त्यांनी दाखवण्यास नकार दिला आणि माझी भूमिका न घेता FIR मध्ये माझे नाव जोडले असा दावा नायडूंनी केला आहे. आता या प्रकरणात काय होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.