
मोठी बातमी! पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा
सोशल मीडिया बंदीवरून हाहाकार, आंदोलकांनी संसद भवन पेटवले, परिस्थिती नियंत्रणाबाहेर, कशामुळे आहे अशांतता?
काठमांडु – नेपाळमध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलनकर्ते सुरुवातीपासूनच पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या सर्व छोट्या, मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदीमुळे नेपाळमध्ये हालचाली टोकाला गेल्या आहेत. या बंदीविरूद्ध निषेध म्हणून नेपाळच्या अनेक शहरांमध्ये आणि भागात तरुणांनी आक्रमक आंदोल पुकारलं होत. नेपाळमध्ये अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती कारण ते सरकारने केलेल्या नियमांचे पालन करीत नव्हते आणि नोंदणी न करता चालत होते. मात्र, या बंदीनंतर मोठा भडका उडाल्याचं पाहायला मिळाल आहे. दरम्यान, या आंदोलनाची धग वाढली असून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात तरुणांनी निदर्शने केल्यानंतर आता मंगळवार, ९ सप्टेंबर रोजीही निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांना हिंसक वळण मिळून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. सोमवारी पोलिसांच्या कारवाईत २० जणांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले. नेपाळच्या केपी शर्मा ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्रामसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवली असली तरी निदर्शकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. अशातच आता पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याच्या काही तास आधी, ओली यांनी निदर्शकांना शांतता राखण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले होते, संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्यांनी या संकटाचे निराकरण करण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची घोषणाही केली होती. पण त्या आधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव नेपाळमधील काठमांडू विमानतळावरून सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. निदर्शकांनी पंतप्रधान केपी ओली यांच्या खाजगी घराला आग लावल्याची माहिती असून निदर्शक विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींच्या घरात घुसूनही तोडफोड केली आहे. महत्त्वाचे म्हणजे नेपाळ सरकारच्या अनेक मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यापैकी नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव हेही राजीनामा देत आहेत. नेपाळमधील शेखर कोइराला (नेपाळ काँग्रेस) गटाचे मंत्री राजीनामा देत आहेत. सोमवारी तत्पूर्वी, नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी हिंसक निदर्शनांची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे.
केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या देशाचे नेतृत्त्व कोणाकडे जाणार, याबद्दल चर्चा चालू झाली आहे. सध्यातरी या पदासाठी नव्या नेत्याचे नाव समोर आलेले नाही. संध्याकाळपर्यंत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. सध्या केपी ओली यांच्या राजीनाम्यामुळे काठमांडूमध्ये जल्लोष केला जात आहे.