
मोठी बातमी! देशातील या पक्षांची मान्यता रद्द
निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, या कारणामुळे मान्यता रद्द, फक्त एवढेच पक्ष शिल्लक, राजकारण बदलणार?
दिल्ली – निवडणूक आयोग आणि राहुल गांधी यांच्यात मागील काही दिवसापासून कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत अनेक पक्षांना धक्का दिला आहे. त्यामुळे अनेक राज्यातील आणि पर्यायाने देशातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. निवडणूक आयोगाने अनेक पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ३३४ राजकीय पक्षांना देशातील नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून काढून टाकण्याची मोठी कारवाई केली आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर आता फक्त ६ राष्ट्रीय आणि ६७ प्रादेशिक आणि २,५२० नोंदणीकृत मान्यता असलेले राजकीय पक्ष देशात आहेत. जूनमध्ये निवडणूक आयोगाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३४५ मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या प्रक्रियेअंतर्गत, अधिकाऱ्यांनी या पक्षांची चौकशी केली, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि वैयक्तिक सुनावणीद्वारे त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली. नंतर सबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे ३४५ पैकी ३३४ राजकीय पक्षांना अटींचे पालन न केल्याबद्दल आपल्या यादीतून काढून टाकले आहे. भारतात राजकीय पक्षांच्या नोंदणीबाबतच्या नियमानुसार, एखादा पक्ष सलग ६ वर्षे निवडणूक लढवत नसेल तर त्याचे नाव नोंदणी यादीतून काढून टाकले जाते. कलम २९अ अंतर्गत नोंदणीच्या वेळी, राजकीय पक्षांना त्यांचे नाव, पत्ता, पदाधिकाऱ्यांची यादी इत्यादी माहिती द्यावी लागते आणि त्यात काही बदल झाल्यास, आयोगाला तात्काळ कळवावे लागते. या पक्षांची कार्यालये त्यांच्या नोंदणीकृत कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर देखील उपस्थित नाहीत. यामुळे निवडणूक आयोगाने अशा सर्व पक्षांची मान्यता काढून घ्यायचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आयोगाने यादीतून वगळलेल्या राजकीय पक्षांना अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. आयोगाने म्हटले आहे की, यादीतून वगळलेले राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी कायदा-१९५१ च्या कलम २९ ब आणि कलम २९ क च्या तरतुदींसह आयकर कायदा-१९६१ आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश-१९६८ च्या संबंधित तरतुदींनुसार राजकीय पक्षांना मिळणारे कोणतेही लाभ मिळविण्यास पात्र राहणार नाहीत. निवडणूक आयोगाने यापूर्वीही अशा कारवाया केल्या आहेत. मे २०२२ मध्ये ८७ आणि जून २०२२ मध्ये १११ पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये २५३ पक्षांना निष्क्रिय म्हणून घोषित करण्यात आले होते.
राष्ट्रीय ६ पक्षांमध्ये भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्ष, बसप, माकप आणि एनपीपी यांचा समावेश आहे. आयोगाच्या यादीनुसार देशात समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांसारखे ६७ पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून नोंदणीकृत आहेत. आयोगाच्या या कारवाईनंतरही देशात मान्यताप्राप्त नसलेल्या २८५४ पक्षांपैकी २,५२० राजकीय पक्ष शिल्लक आहेत.