
मोठी बातमी! महायुतीच्या मंत्रिमंडळात आठवडाभरात फेरबदल?
'या' दोन विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार, 'या' दोन नेत्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन, महायुतीत विस्ताराचे कारण काय?
मुंबई – प्रचंड बहुमताने सत्तेवर येऊनही महायुतीला वर्षभरात आपली घडी नीट बसवता आलेली नाही. त्यांचे मंत्री आणि आमदार सतत वाढत सापडत आहेत. काही मंत्र्यांना नारळ देण्याची किंवा खाते बदल करण्याची नामुष्की या सरकारवर आलेली आहे. आता पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात बदल केले जाणार आहेत.
सहा महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचे आठवडाभरात मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांना हटवून त्याठिकाणी मुंडे यांना मंत्रीपद दिले जाणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता तो विषय मागे पडला आहे. तसेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे मुंडे यांना राजकीय आणि जातीय समीकरण लक्षात घेत मंत्रीपद देण्याचा सूर राष्ट्रवादीत आहे. तर धनंजय मुंडे यांनीही भर सभेत मी रिकामा बसलोय काही तरी जबाबदारी द्या अशी मागणी केली होती. त्यामुळे मुंडे यांच्यावर आठवडाभरात मंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. मंत्रिमंडळातील त्यांचा प्रवेश सुलभ व्हावा, यासाठी पक्षाचे मंत्री झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार असून, त्यांना पक्षाचे मोठे पद दिले जाण्याची शक्यता आहे. मागच्या सरकारमध्ये वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री तानाजी सावंतदेखील मंत्रिमंडळात दाखल होण्याची चिन्हे आहेत. मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने वर्षभरापासून सावंत नाराज आहेत. आता त्यांची नाराजी दूर होण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी भरत गोगावले यांचे मंत्रिपद रिकामे केले जाण्याची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वाढली आहे.
इथून पुढं मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात असे तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील असा स्पष्ट इशारा देत ज्यांना वेळ देणं जमणार नाही, त्यांना खुर्ची खाली करावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. तो देखील महत्वाचा मानला जात आहे.