
मोठी बातमी! विधानसभेत नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई
सभागृहात जोरदार राडा, शेतकरी प्रश्नावर नाना पटोले आक्रमक, राजदंडाला स्पर्श, विरोधक सत्ताधारी आमनेसामने
मुंबई – असंसदीय भाषा आणि अयोग्य वर्तनामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवार, १ जुलै रोजी काँग्रेस आमदार नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन केले आहे. यावेळी सभागृहात जोरदार राडा पहायला मिळाला.
सभागृहात शेतकरी मुद्द्यावर चर्चेदरम्यान नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षातील लोणीकर आणि कृषिमंत्र्यांवर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. लोणीकर आणि कृषिमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करतात. त्यांनी जाहीर माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही’, असे असंसदीय वक्तव्य त्यांनी केले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारची भाषा सभागृहात अपेक्षित नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा!’ आणि ‘ह्या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो!’ अशा घोषणा दिल्या. यामुळे सभागृहात गोंधळ वाढला. त्यामुळे सभागृह पाच मिनिटासाठी तहकुब करण्यात आले. पण पुन्हा सभागृह सुरु झाल्यानंतर पटोले यांनी सभापतींच्या दिशेने धाव घेतली आणि राजदंडाला स्पर्श केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्षेप नोंदवत, अध्यक्षांवर धावून जाणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. पण पटोले हे आक्रमक होत असल्याने नार्वेकर यांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केले. दरम्यान सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे आमदार आणि माजी अध्यक्ष नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर विरोधकांनी तीव्र निषेध नोंदवत एकमुखीपणे सभात्याग केला. ही घटना राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर लोकशाहीचा गळा घोटण्याचा आरोप केला आहे. त्यानंतर विधीमंडळाच्या आवारात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली आहे. “एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळी गोष्ट आहे. पण थेट अध्यक्षांवर धावून जाणे अशोभनीय आहे. जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीने अध्यक्षांवर धावून जाणे हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. नाना पटोले स्वत: अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी असे वागणे योग्य नाही. नाना पटोलेंनी माफी मागायला हवी,”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.