
मोठी बातमी! ‘डिसेंबरपर्यंत राज्यातील मुख्यमंत्री बदलणार’
भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकीय उलथापालथ होणार, दोन नेत्याची ती महत्वाकांक्षा पूर्ण होणार? पडद्यामागे काय घडतंय?
बेळगाव – महाराष्ट्राजवळील कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता थेट ऑपरेशन लोटस राबवत थेट भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होईल, असा दावा भाजपाचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला आहे.
भाजपचे नेते आज बेळगाव दौर्यावर असून त्यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात निश्चितच नोव्हेंबर क्रांती होणार आहे. सिद्धरामय्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री होतील. असा दावा केला आहे. डिसेंबर महिन्यात क्रांती होणार, असे एक मंत्री म्हणत होते. त्यांना काँग्रेस पक्षाकडून घरी पाठविण्यात आले आहे; पण मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरूच आहेत. सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडणार नाहीत, तर डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडणार नाहीत, असेही अशोक म्हणाले आहेत. सिद्धरामय्या वारंवार आपणच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा करत आहेत. परंतु, काही काँग्रेस आमदार विचारत आहेत की, तुम्ही कधी पायउतार होणार. त्यामुळे सिद्धरामय्या अधिक काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत. मुख्यमंत्री बदलाचा करार झाला आहे हे खरे आहे. परंतु सिद्धरामय्या यांना दिलेले अधिकार सोडण्याचे धाडस नाही. दुसरीकडे, डी.के. शिवकुमार मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री बदल निश्चित आहे, असे सांगताना आता आम्ही फक्त निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी वचनबद्ध आहोत. भाजप ऑपरेशन कमळ, युतीद्वारे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत नाही, असे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सांगितले आहे. तसेच भाजपच्या काळात कंत्राटदारांवर ४० टक्के कमिशनचा आरोप होता. ते सिद्ध झालेले नाही. आता कंत्राटदारांनी ८० टक्के कमिशनचा आरोप केला आहे. सिद्धरामय्या यांनी याचे उत्तर द्यावे, असे आर. अशोक म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ तयार झाले आहे, दरम्यान सध्याची परिस्थिती पाहिली तर मुख्यमंत्री बदलल्याने परिस्थिती सुधारणार नाही. सरकार बदलले तरच त्यात सुधारणा व्हायला हवी. सरकार आंधळे आणि बहिरे झाले आहे, असे ते म्हणाले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात पावसामुळे किती घरे पडली आहेत, याची माहिती मुख्यमंत्र्याना नाही. मुख्यमंत्री म्हैसूर दसरा साजरा करण्यात व्यस्त होते. अनुदान मिळत नसल्याने काँग्रेसचे स्वतः चे आमदार नाराज आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केवळ जात सर्वेक्षण महत्त्वाचे वाटते. जाती-जातींमध्ये आग लावण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत, असा आरोपही अशोक यांनी केला आहे.