
मोठी बातमी! पक्षविरोधी कारवायामुळे महिला आमदाराची हकालपट्टी
या कारणामुळे महिला आमदाराला बाहेरचा रस्ता, तुमच्यामुळे पक्षाचे खूप नुकसान झाले म्हणत केली कारवाई
लखनऊ – उत्तर प्रदेशातील चायल विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाच्या (सपा) आमदार पूजा पाल यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उघडपणे कौतुक केले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रयागराजमध्ये २००५ साली पूजा पाल यांचे पती राजू पाल यांची हत्या करण्यात आली होती. माफिया अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांच्यावर या हत्येचा आरोप होता. विधानसभेत पतीच्या हत्येचा उल्लेख करताना पूजा पाल म्हणाल्या की, मुख्यमंत्री योगी यांनी माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा देऊन मला न्याय दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना पूजा पाल म्हणाल्या होत्या की, भाजप सरकारने महिलांवरील अत्याचारांवर झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे. त्यामुळेच आज अतिक अहमद सारख्या माफियाचा नाश झाला आहे. मी माझ्या पक्षाविरोधात नाही, मात्र मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयाने मला वैयक्तिकरित्या खूप दिलासा मिळाला आहे. म्हणूनच मी उघडपणे मुख्यमंत्र्यांचे कौतुक करते. तसेच राज्यसभा निवडणुकीपासून पूजा पाल यांना सपापासून वेगळे करण्यात आले होते. राज्यसभा निवडणुकीत पूजा पाल यांच्यासह आठ आमदारांनी सपाविरुद्ध बंड केले आणि भाजपाच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले. या आठ आमदारांपैकी चार आमदारांना सपाने अलिकडेच पक्षातून काढून टाकले होते. आता पूजा पाल यांना अशा वेळी काढून टाकण्यात आले आहे. तुमच्या पक्षविरोधी कारवायांची पक्षाने नोंद घेतली आहे. वारंवार समज देऊनही तुम्ही या कारवाया सुरूच ठेवल्या, ज्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तुमची कृती ही पक्षविरोधी स्वरूपाची असून गंभीर शिस्तभंगाच्या श्रेणीत येते. या कारणास्तव, तुम्हाला तात्काळ प्रभावाने समाजवादी पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे असे पत्र पाठवत पाल यांची हकालपट्टी केली आहे.
राजकारणाचा अनुभव नसतानाही, पूजा पाल यांनी शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. त्या बसपाकडून तीनदा आमदार झाल्या आहेत. मात्र, आता भाजपची स्तुती केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळेच आगामी काळात त्या भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.