मावळ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सुरूवातीपासून मावळ मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला होता. परंतु महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आज सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यामुळे आता तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठे बदल बघायला मिळत आहेत.
भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे तालुक्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्ष घेतल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे. त्यांच्या या पावलामुळे संत तुकाराम साखर कारखाना अडचणीत येऊ शकतो, अशी शेतकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधी अजित पवार यांनी संत तुकाराम कारखान्याने दिलेला दर कमी असल्याबाबत टिप्पणी केली होती. आता बापूसाहेब भेगडेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने अजूनच राजकीय वातावरण तापले आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतभेदांमुळे संत तुकाराम साखर कारखाना आणखी संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी वर्गाने यावर आपले मत व्यक्त करत, “कारखाना अडचणीत आला तर आम्ही बापूसाहेबांची साथ सोडू,” असे सूचित केले आहे. तालुक्यातील राजकीय हालचालींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढे काय घडणार ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.