दौंडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का ; अखेर रमेश थोरात यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, दौंडमध्ये राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात निवडणुकीच्या रींगणात
गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्याचा तिढा सुटता सुटत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या राज्यातील अधिकृत उमेदवारांच्या तीन -तीन याद्या येऊनही दौंड चे अधिकृत उमेदवार कोण हे ठरले नव्हते. त्यामुळे रमेश थोरात यांचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत होते, मात्र आज (दि .28 ऑक्टोबर) रोजी अखेर दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. तसेच प्रवेश झाल्यावर एबी फॉर्म देण्यात येणार असल्याने दौंडची उमेदवारी देखील निश्चित करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबई येथे माजी आमदार रमेश थोरात व दौंड तालुक्यातील इतर इच्छुकासह शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. त्याच निर्णयासंदर्भात आज सकाळी रमेश थोरात यांनी शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून शरद पवार देतील तो निर्णय मान्य करू असे रमेश थोरात यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र आज सकाळी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर तिथेच अधिकृतरीत्या पक्ष प्रवेश देखील देण्यात झाला आणि त्यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी ही देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे नेहमीप्रमाणे आताही दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात अशी अटीतटीची लढत होईल. शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे रमेश थोरात यांच्या समर्थकांना बळ मिळाले आहे. आज दौंड येथे माजी आमदार रमेश थोरात हे आपला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अर्ज भरणार आहे.