भाजपाचे पुणे, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरले?
भाजपाच्या मिशन ४५ ची तयारी जोरात, उमेदवारीची घोषणा?, भाजपा शिंदे गटात वादाची ठिणगी?
पुणे दि ८(प्रतिनिधी)- भाजपाने लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असतानाच लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.भाजपाने यंदा पुण्यातील सर्वच लोकसभा जिंकण्याची तयारी सुरु केली असुन त्यासाठी त्या मतदारसंघातील नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तेच त्या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपाने महाराष्ट्रात मिशन ४५ सुरु केले आहे. त्यानुसार मतदारसंघाची विभागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे तेच संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले असुन १९९१ पासून असलेले पवार कुटुंबियांचे वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. तर दुसरीकडे २००९ पासून शिवसेनेकडे असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. तो देखील काबीज करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमदार राहुल कुल यांना बारामती तर आमदार महेश लांडगे यांना शिरूर लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. यातील लांडगे यांनी खासदार होण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले होते, तर कुल यांनी मात्र दाैंडवरच लक्ष केंद्रीत केले होते. तर भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अर्थात तेच गिरिश बापट यांचे राजकीय वारसदार असणार का यांचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे.
भाजपाने यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे हा मतदारसंघ भाजप शिंदे गटाला सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण शिरूर लोकसभेवरुन मात्र शिंदे गट आणि भाजपात वाद होण्याची शक्यता आहे. आढळराव पाटील यांनी बंडखोरी केल्यास त्याचा फटका युतीला बसण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे.