
बीडमध्ये भरदिवसा भाजपा पदाधिकाऱ्याची कोयत्याने वार करत हत्या
हत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल, कोयत्याने वार करत खुन, आरोपी स्वतः पोलिसांना शरण, राज्यात खळबळ
बीड – बीडचा माजलगाव शहरातील शाहूनगर भागात एका भाजप कार्यकर्त्याची भर दुपारी रस्त्यावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. हत्येचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
बाबासाहेब प्रभाकर आगे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भाजपाचे माजलगाव तालुका सरचिटणीस होता. आरोपी नारायण शंकर फपाळ याने हे कृत्य केले असून तो स्वतःहून शहर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. बाबासाहेब आगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी माजलगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर बाबासाहेब आगे याचा हातात कोयता घेऊन नारायण शंकर फपाळ हा पाठलाग करत होता. आगे जिवाच्या आकांताने आगे पळत पळत माजलगाव बस स्थानकापासून जवळच असलेल्या शाहूनगरच्या बाजार रस्त्यावर आले. मात्र, तेथे जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर फपाळ याने बाबासाहेब आगे यांना गाठलेच. त्यानंतर काही कळायच्या आत नारायण फपाळ याने आगे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले, त्यानंतर तो पसार झाला. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी बाबासाहेब आगे यांना गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी आगे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हल्ला केल्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्याने आगे यांचा खून का केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. पण दिवसा घडलेल्या या घटनेने बीडसह महाराष्ट्र हादरला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मयत बाबासाहेब आगे हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत. संतोष देशमुख यांच्यानंतर बीडमधील ही भाजपा पदाधिकाऱ्याची दुसरी हत्या आहे.