
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्याला नेसवला शालू
भाजपचा भररस्त्यातील प्रतापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मोदींच्या विरोधातील पोस्टमुळे भाजप आक्रमक, नेमकं घडलं काय?
डोंबिवली – डोंबिवलीत भाजप आक्रमक झाली असून कॉंग्रेसचे नेते प्रकाश उर्फ मामा पगारे’ यांना भर रस्त्यात साडी नेसवून भाजप पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मॉर्फ करून साडीमध्ये दाखवले आणि त्याचसोबत पगारे यांनी समाज माध्यमांत प्रसारित केली होती. त्यामुळे भाजप संतप्त होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत या प्रतिमेच्या सोबत ‘मी कशाला आरशात पाहू ग, मी माझ्या रूपाची खाण ग, मी कशाला बंधनात राहू ग’, हे गाणे सामायिक केले होते. काँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी व्हायरल केल्याची माहिती समोर आली. मामा पगारे डोंबिवलीत राहतात. ते सकाळच्या वेळेत डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्ता भागात असतात. अशी गुप्त माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना मिळाली. त्याप्रमाणे मामा पगारे यांना सकाळच्या वेळेत पगारे बाहेर येताच भाजप पदाधिकाऱ्यांनि त्यांना घेराव घातला. पगारे यांना पाहताच भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांचे दोन्ही हात पकडले. संदीप माळी आणि माळेकर यांनी मामा पगारे यांना शालू नेसविण्यास सुरूवात केली. यावेळी पगारे यांनी विरोध करताच पुन्हा असे काही करू नका असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. भाजपने केलेल्या विरोधानंतर डोंबिवली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा असे कृत्य केल्यास भाजपची स्टाईल दाखवू, असा भाजप कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. भर रस्त्यातील या घटनेमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे आला आहे.
भाजपचे पंतप्रधानच काय भाजपच्या कोणाही नेत्याची कोणीही समाज माध्यमात बदनामी केली तर त्याला भाषेत भाजप पदाधिकारी प्रत्युत्तर देतील. म्हणून मामा पगारे यांना आम्ही भर रस्त्यात शालू नेसविला, असे परब म्हणाले आहेत.