केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत काल रात्री बैठक झाली. या बैठकीत राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे म्हटले जात आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत नवीन सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एका मंत्रालयाने भाजप हायकामांडचे टेन्शन वाढविले आहे
महाराष्ट्रात नवीन सरकारच्या शाही शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु आहे. सरकार स्थापन करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निर्माण झालेल्या ओढाताणीमुळे हायकमांड अस्वस्थ झाले आहे. गृह मंत्रालयावर या मुद्यावरून भाजप आणि शिवसेना आमने सामने आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह मंत्रालयावर दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस मात्र गृह मंत्रालय सोडायला तयार नाहीत. त्यांना गृह खाते सोडायचे नाही आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल गुरुवारी झालेल्या महायुतीतील नेत्यांच्या बैठकीतही गृह मंत्रालयाचा मुद्दा चर्चीला गेला. मात्र दोन्ही नेते अडून बसल्यामुळे गृह खात्याचा निर्णय होऊ शकला नाही. अशात, २ डिसेंबरपूर्वी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गृह खात्याचा मुद्दा सोडविला जाईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, भाजप हायकमांड शिंदे आणि फडणवीस यांच्यापैकी कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. शिंदे- फडणवीस यांच्यापैकी आता कोणाला गृहमंत्री पद मिळणार हे आता शपथविधी दिवशी जनतेसमोर येणार आहे.