
माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट येत आहे. धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असतानाही भाजपनं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले.त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील देण्यात आली. माढ्यामध्ये आता धैर्यशील मोहिते पाटील विरोधात रणजीतसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे. मात्र दुसरीकडे या मतदारसंघात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.
उत्तमराव जानकर यांनी धैर्यशील मोहीते पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र दुसरीकडे भाजपनं देखील आता मोठा डाव टाकला आहे. माढा लोकसभा मतदार संघात विजय खेचून आणण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी आता माढा तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आमदार बबन शिंदे आणि शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजी सावंत हे आता एकत्र येऊन भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.
विशेष म्हणजे एकीकडे माळशिरसमध्ये शरद पवार यांच्या प्रयत्नानं मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक एकत्र आले, तर दुसरीकडे आता भाजपने सावंत आणि शिंदे यांना एकत्र आणलं आहे. शिंदे आणि सावंत हे गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांचे विरोधक आहेत. वेगवेगळ्या पक्षात असेल तरी ते सध्या महायुतीसाठी एकत्र आले आहेत.