
ब्रेकिंग! दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी
मागील वर्षाच्या तुलनेत कमी निकाल! राज्यात 'या' विभागाची बाजी, 'एवढ्या' विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क
पुणे – राज्यातील दहावीच्या परिक्षेचा निकाल लागला असून दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा मुलींचा वरचष्मा या निकालात दिसून आला आहे. राज्याचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला आहे. मुलांचे निकाल दुपारी १ वाजता भेटणार आहेत.
यंदाच्या निकालाची टक्केवारी मागील वर्षाच्या तुलनेत १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला असून, कोकण विभागाने पहिल्या नंबरवर असून, कोकणाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका लागला असून, यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. यात मुलींचा निकाल ९६.१४ टक्के तर, मुलांचा निकाल ९२.३१ टक्के इतका लागला आहे. दहावीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६२ पैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. तर २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.
विभागवार निकाल खालीलप्रमाणे
– कोकण : ९८.८२ टक्के
– कोल्हापूर : ९६.८७ टक्के
– मुंबई : ९५.८४ टक्के
– पुणे : ९४.८१ टक्के
– नाशिक : ९३.४ टक्के
– अमरावती : ९२.९५ टक्के
– छ.संभाजी नगर : ९२.८२ टक्के
– लातूर : ९२.७७ टक्के
– नागपूर : ९०.७८ टक्के