
महाराष्ट्र प्रतिनिधी – महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने थोडा वेळ दिला आहे. सर्व आमदारांना पुढील पाच दिवसांमध्ये आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला आव्हान देत थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शिंदे गटाच्यावतीने 15 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर शिंदे गटांचे वकील आणि सरकारच्या वकिलाांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. सुनावणीच्या आधीच न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाही, अशी विचारणा केली आहे. तसंच, उपाध्यक्षांवर प्रश्न कसे उपस्थितीत करू शकता, असा सवालही केला.
सुप्रीम कोर्टाने उपाध्यक्ष यांना नोटीस बजावली असून यामध्ये सहाही पक्षांना नोटीस दिली आहे. केंद्र सरकारला सुद्धा नोटीस दिली आहे. बंडखोर 16 आमदारांना सुद्धा नोटीस दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी आपल्या उत्तरांची तयारी करावी, अशी सूचना कोर्टाने दिली. बंडखोर आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. शिवसेनेनं आमदारांना जी नोटीस बजावली आहे, जोपर्यंत सुनावणी होत नाही. तोपर्यंत कारवाई करू नये, असे निर्देशही कोर्टाने दिले आहे. उपाध्यक्ष झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना आज संध्याकाळपर्यंत म्हणणे मांडायचे होते. पण, सुप्रीम कोर्टाने आता ही नोटीस 12 जुलैपर्यंत लांबवली आहे. त्यामुळे राजकीय पेच प्रसंग 2 आठवडे कायम राहणार आहे.