
ब्रेकिंग! भाजपाच्या या आमदाराला लागली मंत्रिपदाची लॉटरी
फडणवीसांकडून आदेश जाहीर, विशेष बाब म्हणत दिले मंत्रीपद, अनेक वर्षानंतर मंत्रीपदाची अपेक्षा पूर्ण, काय घडले?
मुंबई – महाराष्ट्रात म्हाडाच्या धर्तीवर नव्या स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरमाचे अध्यक्ष असलेले आमदार प्रविण दरेकर यांना मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने का होईना पण दरेकर यांची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली आहे.
राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात येणाऱ्या स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजप विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांची नियूक्ती करण्यात आली आहे. सोमवार, २९ सप्टेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून प्राधिकरण अध्यक्षाला मंत्रीपदाचा दर्जा असणार आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या दरेकर यांनी या बँकेच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याकरीता बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु केली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याकरीता प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून सवलती देण्याबाबत शिफारसशी करण्यासाठी राज्य सरकारने एप्रिल महिन्यात दरेकर यांच्याच अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती केली होती. अभ्यासगटाने जुलैमध्ये आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. अभ्यासगटाने सादर केलेल्या शिफारशींची प्रभावी अंलबजावणी करण्यासाठी स्वयं,समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या प्राधिकरणावर अध्यक्ष म्हणून दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना विशेष बाब म्हणून मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अध्यक्ष आ. दरेकर यांची नियुक्ती पुढील शासन आदेश होईपर्यंत करण्यात येत आहे. मंत्रीपदाच्या दर्जासाठी देण्यात येणारे भत्ते व सुविधा तसेच त्यांच्या कार्यालयासाठी जागा, आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक, त्यांचे भत्ते हे म्हाडा प्राधिकरणातर्फे देण्यात यावे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
याविषयी बोलताना दरेकर यांनी राज्यातील विशेषतः मुंबई उपनगरे, पुणे, नाशिक व नवी मुंबईतील स्वयंपुनर्विकासाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. प्राधिकरणामुळे येथे सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देणे शक्य होणार आहे. शासनाने मोठी जबाबदारी दिली असून, स्वयंपुनर्विकास क्षेत्रात मोठे काम झाल्याचे आगामी काळात दिसून येईल, असे सांगितले आहे.