
इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या रागातून बेदम मारहाण
मारहाणीचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद, पाठलाग करत दिला बेदम चोप, सोशल मीडियाचा अतिरेकी परिणाम धक्कादायक
शिरूर – सोशल मीडियावरील किरकोळ कारणांवरून तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वादाची प्रकरणे घडत आहेत. त्यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. असाच काहीसा प्रकार शिरूर तालुक्यात समोर आला त्या ठिकाणी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
इन्स्टाग्रामवर फ्रेंड रीक्वेस्ट स्वीकारली नाही, या कारणावरुन काही तरुणांनी मिळून रोहन खामकर नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली आहे. शिरूर तालुक्यातील डोंगरगण फाट्यावरील हॉटेल स्वरा येथे फॅब्रिकेशनचे दुकानात काम करत असलेल्या तरुण बसला असता इंस्टाग्रामवर पाठवलेली रिक्वेस्ट का स्वीकारली नाही म्हणून चारजणांच्या टोळीने लाकडी दांडक्याने हल्ला करून जबर मारहाण केली आहे. याबाबत रोहन मळीभाऊ खामकर याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमर मुंजाळ, हर्षद खाडे, करण चव्हाण सचिन पवार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी डोंगरगण फाट्यावरील हॉटेल स्वरा येथे फॅब्रिकेशनचे काम करीत असताना चार पाच दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामला पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून चिडून जाऊन शिनगारवाडी गावाजवळील म्हसे बु. येथील खांडे वस्तीवरील अमर मुंजाळ याने त्याच्यासोबत हर्षद खाडे, करण चव्हाण व सचिन पवार यांनी हॉटेलमध्ये लाकडी दांडक्यांनी, हाताने व लाथाबुक्क्यांनी हातावर, तोंडावर व डोक्यात जबर मारहाण केली. मारहाणीच्या भीतीने हॉटेल बाहेर पळून जात असताना आरोपींनी तरुणास पाठलाग करून करून जखमी केले आहे. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून,या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार प्रशांत गायकवाड हे करत आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरील किरकोळ वाद किती गंभीर स्वरूप धारण करू शकतात याचे हे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.