
नागपूर – मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जरांगे यांना पेढा भरवला. दरम्यान यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमंक काय म्हणाले फडणवीस ?
मला आनंद आहे, सरकारने सकारात्मकता दाखवली. मनोज जरांगे यांचं मी अभिनंदन करतो. कायदेशीर प्रक्रियेद्वारे मार्ग काढावा लागेल असं आम्ही सांगत होतो. नोंदी असलेल्या रक्ताच्या नात्यातील लोकांना प्रमाणपत्र देता येईल. सरकारने मार्ग स्विकारला आहे. मराठा समजाचा प्रश्न सुटणार आहे. सोबतच राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. ओबीसींवर देखील अन्याय होऊ दिला जाणार नसल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत ही एक मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे, गुन्हे मागे घेतले जातील. पण घर जाळणे, थेट हल्ला हे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत. इतर गुन्हे मागे घेतल्या जातील.
दरम्यान एकीकडे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानं मराठा समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे मात्र या निर्णयावर छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यपद्धती असते, भुजबळ यांना स्पष्ट सांगू इच्छितो ओबीसींवर अन्याय होणार नाही. कायदेशीर अडचण होती ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली, भुजबळ साहेबांचं समाधान होइल. दोन्ही बाबी सुरू आहेत, मोठा समाज आहे. क्युरेटिव्हमध्ये मार्ग नाही निघाला तर सर्वेक्षणामधून मार्ग निघेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.