सोलापुरात चिरीमीरी घेताना पोलीस कॅमेऱ्यात कैद
वाहतूक पोलिसाची राजेरोस वसुली, आॅनलाईन दंडाला पोलीसांचाच ठेंगा
सोलापूर दि १० (प्रतिनिधी)- सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याचा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पोलीसच नियमाला हरताळ फासत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यामु़ळे खळबळ उडाली आहे.
पोलीस चिरिमीरी घेत असलेली व्हिडिओतील घटना सोलापूरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ भर रस्त्यात घडली आहे. चाैकात एका वाहन चालकाला चाैकात उभारलेल्या दोन ट्राफिक पोलिसांनी थांबविले. नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र थोड्यावेळाने विशिष्ट चिरीमीरी घेऊन त्या वाहनचालकाला सोडून देण्यात आले. हा सगळा घटनाक्रम कॅमे-यात कैद झाला आहे. अगदी दिवसाढवळ्या पोलीसच नियमाला हरताळ फासत असल्याने अनेकांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. पोलिसांकडून देखील या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आलीय. व्हिडीओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आॅनलाईन कारभारालाही हरताळ फासला जात असल्याने साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
एखाद्याने वाहतूकीचे नियम तोडल्यानंतर त्याला वाहतूक पोलीस दंड करतात. त्यावेळी तडजोड करुन अनेकजण दंडापासून बचाव करायचे. त्यामुळे वाहतूक विभागाने आॅनलाईन दंडाची तरतूद केली.तरीही चिरीमिरी घेण्याच्या घडत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाला याचा विचार करावा लागणार आहे. पण पोलिसाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.