सांगली दि १०(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जत तालुक्यातील बिळूर येथे तलावाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडला आहे. तीन लहानग्या मुलींसह आईचा मृतदेह तलावामध्ये आढळून आल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पाण्यात बुडून आई सुनिता तुकाराम माळी,आणि मुली अमृता अंकिता आणि ऐश्वर्या तुकाराम माळी अशी आहेत.मिळालेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील बिळुर येथील सुनीता माळी या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलावावर गेल्या होत्या. त्यांच्या घराजवळच त्यांची शेती असून जवळच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सुनीता आणि तीन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत. अगदी सुनिता यांच्या माहेरी कोहळी येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पण सोमवारी तलावात चौघींचे मृतदेह तलावात पाण्यावर तरंगताना आढळून आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.
सुनिताचे पती तुकाराम माळी फरार आहेत.मायलेकींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने बिळूर आणि जत तालुक्यात शोककळा पसरली आहे. पण या घटनेबद्दल बिळुर भागात उलट सुलट चर्चाही सुरू होती. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.