
रायगडच्या ‘त्या’ व्यवहारांमध्ये चाकणकरांचा सहभाग?
महत्त्वाची माहिती समोर आल्याने तर्कवितर्कांना उधाण
अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष केले जात असताना दोन दिवसांपूर्वी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत थेट सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते.

याबाबत आता मोठी माहिती पुढे आली आहे. तटकरे यांचे होमग्राऊंड असलेल्या रायगड मधील रोह्यात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे. आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून रोह्याच्या रोठ खुर्द येथे बहुमजली इमारत उभी केली आहे. आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड रिव्हर राफ्टींग, कर्जत रिव्हर राफ्टींग, गीता ॲग्रो ॲन्ड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटॅलिटी, रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट आणि कर्मा कंस्ट्रक्शन हे मोठे व्यवसाय नोंदणीकृत आहेत.

रुपाली चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्या रोह्यातील इमारत बांधकाम प्रकरणी भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याची ही केस असून यामुळे चाकणकर यांचा चौधरी यांच्यासोबत रायगडमध्ये व्यवसाय सुरु असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.


