उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद सोडण्याचे आव्हान
भाजपाचे सत्तेतून उच्चाटन करण्यासाठी एकत्र प्रयत्न करु, जागा वाटपाचा निर्णय मविआच्या बैठकीत निर्णय
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेताना मताचे विभाजन होणार नाही यावरही भर दिला जात आहे. देश वाचवण्याची ही लढाई असून देश, लोकशाही, संविधान वाचवणे हे आमचे काम आहे. जागा वाटपाचा निर्णय मविआच्या बैठकीत मेरिटच्या आधारावर होईल. भाजपाचे सत्तेतून उच्चाटन करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करु हाच आमचा मुख्य उद्देश आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीला विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या प्रत्येक जागेचा बारकाईने अभ्यास केला आहे. मविआची बैठक होईल त्यावेळी प्रत्येक जागा कशी जिंकता येईल यावर आम्ही सर्वजण विचार करु. पुढच्या आठवड्यात इतर समविचारी पक्षांबरोबरही चर्चा करणार आहोत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे २५ जूनला सांगली येथे एका कार्यक्रमासाठी येत आहेत, त्यांच्याबरोबरही बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. निवडणुकीत शेतकरी, बेरोजगारी, महागाई हे प्रमुख मुद्दे असतील. देशातील या ज्वलंत मुद्द्यांवर जनतेत जाऊन भाजपा सरकारची पोलखोल करु. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही जेव्हा त्यांचा प्रस्ताव येईल त्यानंतर त्यावर चर्चा करु. मविआने एकत्र राहून निवडणुका लढवाव्या हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे सहा-सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. मंत्रालयातील अवेक विभाग आहेत त्यामुळे त्यांना गृहमंत्रीपद झेपत नाही. फडणवीस यांना जमत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपद सोडावे असे आव्हान पटोले यांनी दिले.