पुणे – राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी भेटीगाठी वाढल्या आहेत. पुण्यात मात्र राजकारण्यांचे सत्कार कुख्यात गुंडांकडून केले जात आहेत. कुख्यात गुंड गजा मारणे याची आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. गजा मारणेच्या घरी जात पाटलांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर याचे फोटो देखील व्हायरल झाले आहे. याआधीच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि शरद पवार यांचे खासदार निलेश लंके यांनी देखील गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. पुण्यामध्ये मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडला. यावेळी राजकीय सत्कार, समारंभ मोठ्या प्रमाणात पार पडले. पण सगळ्यात जास्त चर्चा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराची सुरु आहे. कारण चंद्रकांत पाटील यांचे स्वागत आणि सत्कार चक्क गुंड गजा मारणे याने केला.
दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. याचे फोटो व्हायरल झाल्यामुळे अनेकांनी टीकास्त्र डागले आहे. मात्र यावर अद्याप चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. गजानन उर्फ गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. तो कोथरूड भागात राहायला आहे. तर भाजप नेते चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. लवकरच विधानसभा निवडणूका असल्यामुळे ही भेट चर्चेचे कारण ठरली आहे. याआधी लोकसभा निवडणूकीपूर्वी खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे.