चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका ; “देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपविण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील”
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. एकतर तू राहशील नाहीतर मी अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे.तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील असं म्हणत पलटवार केला आहे. तसेच “देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करताहेत” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर तर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रताही नाही, त्यामुळे घाम फोडण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करताहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावं, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजींच्या पाठीशी जनता आहे, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.