अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावर भाष्य करत काल 14 जुलै रोजी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.त्यांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले होते. यातच आज सोमवारी छगन भूजबळ शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मात्र अद्याप या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही भेट होणार आहे. या भेटीसाठी छगन भुजबळ हे सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच आता छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यामुळे सध्या या भेटीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.सध्या राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे अनेकदा छगन भुजबळ महायुतीवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या मुद्दयांवर आजच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे कामाला लागले होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या गटाने आतापासूनच तयारी चालू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची बारामतीत एक मोठी सभा पार पडली.यावेळी आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी तो प्रश्न सोडवला पाहिजे.
तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत,” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता.त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ सिल्वहर ओकवर पोहोचले आहेत. भुजबळ यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीमागचे नेमके कारण काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.