
मुख्यमंत्र्यांनी भर सभेत पोलीस अधिक्षकांवर उगारला हात
घटनेचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड, विरोधी पक्षाच्या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्री संतप्त
बेळगाव – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळागाव येथील एका जाहीर सभेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक नारायण भरमनी यांच्यावर हात उगारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सिद्धरामय्या बेळागाव येथे काँग्रेसच्या ‘संविधान बचाव’ परिषदेत भाषण करण्यासाठी आले होते. यावेळी मंचाच्या जवळ BJP च्या काही महिला कार्यकर्त्यांनी काळे कापड दाखवत आणि घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने केली. या व्यत्ययामुळे चिडलेल्या सिद्धरामय्या यांनी मंचावरून “ऐ पोलिस!” असे ओरडत ASP नारायण भरमनी यांना बोलावले. त्यांनी भरमनी यांना “SP कोण आहे? तुम्ही काय करताय?” असे विचारत अपमानास्पद शब्दांत फटकारले आणि हात उगारला, ज्यामुळे ते थप्पड मारणार असल्याचे दिसले. भरमनी यांनी त्वरित मागे सरत स्वतःचा बचाव केला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या कृतीवरून आता संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर, जेडीएसने एक्स वरील पोस्टमध्ये सिद्धरामय्या यांच्यावर अहंकार आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. “तुमचा सत्तेचा कालावधी फक्त ५ वर्षांचा आहे. पण सरकारी अधिकारी ६० वर्षांपर्यंत सेवा करतात. सत्ता कोणासाठीही कायमची नसते. तुमचे गैरवर्तन दुरुस्त करा”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर भाजपानेही सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत हा प्रकार सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला. याआधीही सिद्धरामया यांनी २०१९ मध्ये त्यांनी मैसूर विमानतळावर आपल्या एका कार्यकर्त्याला थप्पड मारली होती, तर २०२३ मध्ये बेंगलुरूत एका समर्थकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
https://x.com/JanataDal_S/status/1916793273336869119?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1916793273336869119%7Ctwgr%5E48c70316145fb7df54ea03f0338f6c0ad93f3f0f%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
या घटनेपूर्वी सिद्धरामय्या यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान युद्ध टाळण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. पण टिका झाल्यावर त्यांनी यु टर्न घेतला होता.